पुणे : पतंगबाजीचा भरपूर आनंद नुकताच आपण सर्वांनी लुटला. परंतु या पतंगबाजीत वापरलेल्या नायलॉन मांजामुळे आता पक्ष्यांवर ‘संक्रांत’ आली आहे. शहरात अनेक ठिकाणी नायलॉन मांज्यामध्ये पक्षी अडकत असल्याचे चित्र आहे. मांज्यात अडकल्याने ते जखमी होत आहेत. अशा ८४ पक्ष्यांची सुटका गेल्या पंधरा दिवसांमध्ये पक्षीप्रेमींनी केली आहे.
शहरात वाइल्ड ॲनिमल्स ॲण्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी कार्यरत आहे. त्याची स्थापना आनंद तानाजी अडसूळ यांनी केली. त्यांचे सदस्य विविध ठिकाणी असून, ते मांज्यात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करत आहेत. त्यामुळे अनेक पक्ष्यांना जीवदान मिळाले आहे. तसेच जखमी झालेल्या पक्ष्यांना कात्रज येथील राजीव गांधी अनाथालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. ज्या पक्ष्यांना जखम झालेली नाही त्यांचा मांजा काढून तिथूनच आकाशात मुक्त विहारासाठी सोडण्यात आले.

नायलॉन मांज्यावर पोलिस प्रशासनाकडून कारवाई सुरू असली तरीही अनेकजण त्याचा वापर करत आहेत. काही ठिकाणी लहान मुलांना साधा मांजा वापरा, अशी जनजागृती केली. तेव्हा त्या मुलांनी शपथ घेऊन नायलॉन मांजा वापरणार नाही.
साधा मांजा वापरल्यानंतर तो पक्ष्यांसाठी घातक ठरत नाही.