कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्ह्यांतर्गत शिक्षा भोगत असलेला कैदी सतपालसिंग जोगिंदरसिंग कोठाडा (वय ३९, रा. डिंपल कौर, सायन कोठीवाडा, मुंबई) याचा दुसऱ्या कैद्याने डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी (दि. ५) पहाटे दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी गणेश लक्ष्मण गायकवाड (वय २९, मूळ रा. वाशी, रमाबाई झोपडपट्टी) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मस्करी केल्याच्या रागातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली. कैद्यानेच कैद्याचा खून केल्यामुळे कळंबा कारागृहातील सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा झालेला सतपालसिंग हा २०१७ पासून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. तर संशयित हल्लेखोर आरोपी गणेश गायकवाड हा ठाणे येथे खून केल्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. २०२१ पासून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. सतपालसिंग आणि गायकवाड हे दोघे कारागृहातील ओळखीनंतर मित्र बनले होते. दोघेही कारागृहातील रुग्णालयाच्या स्वच्छतेचे काम करीत होते.

शनिवारी रात्री हे दोघे रुग्णालयात झोपले होते. मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास गायकवाड याने सतपालसिंगच्या डोक्यात दगड घातला. मोठा आवाज होताच ड्युटीवर असलेले दोन शिपाई रुग्णालयात गेले. त्यावेळी सतपालसिंग हा गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. साडेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शिपाई अक्षय कैलास वाघमारे यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिसात दिली.