पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास उलगडणारे फ्रान्सच्या पत्रकाराने पुण्यात साकारलेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहास’ या संग्रहालयात महिला योद्धांच्या विषयी साकारण्यात आलेल्या दुसऱ्या माहिती कक्षाचे उद्घाटन नुकतेच पार पडले.
त्याचबरोबर संग्रहालयातील मंदिरात तुळजा भवानी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे आता या संग्रहालयात २२ माहिती कक्ष उपलब्ध असून हे संग्रहालय विनामूल्य नागरिकांसाठी खुले आहे. लोहगाव येथील गुलभारती वस्ती येथे हे संग्रहालय आहे. फ्रॉन्सवा गॉटियार आणि त्यांची पत्नी नम्रिता गॉटियार यांनी ‘फाउंडेशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ कल्चरल टाइज’ संस्थेच्या माध्यमातून २०१० मध्ये हे चित्ररूपी संग्रहालय साकारले आहे.

संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासाबरोबरच भारताचा इतिहास, स्वामी विवेकानंद तसेच काश्मी र व बांगलादेशच्या घडामोडींवर माहिती देणारे दालने आहेत. या संग्रहालयाला रविवारी श्री श्री रविशंकर यांनी भेट दिली. याबाबत फॅक्टचे संस्थापक विश्वतस्त फ्रॉन्सवा गॉटियार यांनी सांगितले, भारताच्या समृद्ध इतिहासाची माहिती ही तळागाळापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आम्ही या संग्रहालयाच्या माध्यमातून करत आहोत. या संग्रहालयात लवकरच राणी अब्बाक्का व राणी दुर्गावती यांच्या माहितीचे चित्रे उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर या संग्रहालयात विजयनगर साम्राज्याची माहिती देणारे दालन ही तयार करण्यात येत आहे. याच्या कामाला सुरवात झाली आहे.
दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते. संग्रहालयात मांडण्यात येत असलेल्या इतिहासातील विविध घडामोडींबाबत जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळावी हा मुख्य उद्देश आहे. असे नम्रिता गॉटियार यांनी सांगितले.