नंदुरबार : बहिणीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून शुक्रवारी रात्री मच्छी बाजार परिसरात भररस्त्यात मुलीच्या भावाने तरुणास धारदार शस्त्राने छातीत वार करून जागीच ठार केले. घटना घडताच आरडाओरडा सुरू होऊन परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाला होता. नागरिकांनी जखमी तरुणास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर त्या परिसरात जमाव जमला होता. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह पोलिसांचा ताफा तत्काळ घटनास्थळी पोचल्याने जमावाची समजूत काढत शांतता प्रस्थापित केली.

शहरातील मच्छी बाजार परिसरातील अरबाज खाटीक याने चार वर्षांपूर्वी त्याच परिसरातील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या युवतीशी प्रेमविवाह केला होता. त्या रागाचे भूत मुलीच्या भावाच्या डोक्यात तेव्हापासून शिरले होते. शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास अरबाज खाटीक मच्छी बाजार परिसरातील बोहरी मशिदीजवळून जात असताना मुलीचा भाऊ जयेश दयाराम गंगावणे याने पाहिले. त्याला भररस्त्यात गाठून त्याच्या छातीत धारदार चाकूने वार करून ठार केले. या वेळी खाटीकने आरडाओरडा केला.
या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यात कोणी चाकूहल्ला, कोणी खून अशा विविध प्रकारच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अफवांवर विश्वाास न ठेवण्याचे आवाहन केले. तत्काळ मच्छी बाजार, जळका बाजार, घी बाजार, सोनार खुंट परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला.