मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिसात दाखल केली आहे. त्यामुळे पोलिसात विनोद कांबळीविरुद्ध कलम ३२४ आणि कलम ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर पत्नीवर स्वयंपाकाचे भांडे फेकून मारल्याचा आरोप आहे, यात पत्नीच्या डोक्यालाही मार लागला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कांबळी आणि त्याची पत्नी यांच्यात भांडण झाले. त्यावेळी विनोद कांबळी मद्यधुंद अवस्थेत त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटवर आला. त्यानं पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोघांचं भांडण पाहून त्यांचा १२ वर्षांचा मुलगा देखील घाबरला.

हे भांडण केवळ शिवीगाळ करण्यापुरते मर्यादित राहिले नाही, त्यानंतर कांबळीने स्वयंपाकघरात जाऊन कुकिंग पॅन उचलला आणि पत्नीच्या दिशेने फेकून मारला. पोलिसांनी सांगितले की, तक्रार देण्यासाठी येण्यापूर्वी कांबळीच्या पत्नीने भाभा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार केले होते. घटनेनंतर विनोद कांबळीचा मोबाईल स्विच ऑफ येत आहे. पत्नीने त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, मारहाण आणि मुलाला शिवीगाळ करतो असं नमूद केलं आहे. तसंच विनोद कांबळीनं कुकिंग पॅननं मारलं. इतकंच नव्हे, तर बॅटनंही मारहाण केली आहे.