Latest Marathi News

BREAKING NEWS

सावकारी अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा : जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी : सावकारांच्या जाचाने पिडीत कर्जदारांनी संपर्क साधण्याचे आवाहन

0 290

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी दिले.

सावकारांकडून होणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी व सावकारीचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 दि. 16 जानेवारी 2014 पासून अंमलात आलेला असून याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची सभा नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सांगली यांचे प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक व समितीचे सदस्य सचिव मंगेश सुरवसे, तालुक्याचे उप/सहाय्यक निबंधक उपस्थित होते.

Manganga

महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील कलम 18 अन्वये सावकारीच्या ओघात संपादित केलेली स्थावर मालमत्ता परत करण्याबाबतची तरतूद आहे. अशा प्रकरणी प्राप्त तक्रारी अर्जावर चौकशी करण्यात आल्यावर तसेच वैयक्तीक सुनावणी झाल्यानंतर सावकाराने दिलेल्या कर्जाबददल प्रतिभूती म्हणून स्थावर मालमत्ता सावकाराच्या कब्जात असल्याची जिल्हा निबंधकाची खात्री पटली तर तो संलेख किंवा अभिहस्तांतरणपत्र अवैध असल्याचे घोषित करता येईल आणि त्या मालमत्तेचा कब्जा कर्जदाराकडे किंवा यथाशक्ती त्याच्या वारसाकडे किंवा उत्तराधिकाऱ्याकडे परत करण्याचा आदेश देण्याची तरतूद आहे. नोंदणीकृत सावकाराने नियमाप्रमाणे 20 हजार रूपये वरील कर्जाच्या रकमा चेकव्दारेच देणे आवश्यक आहे. तसेच कर्जदाराकडून देखील परवानाधारक सावकाराने 20 हजार रूपये वरील कर्जाच्या रकमा RTGS, NEFT अथवा चेकव्दारेच स्विकारण्याचे आहे. याबाबत सावकारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास अशा सावकारांना कारणे दाखवा नोटीस देवून परवाने रद्द करण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल. सर्व सावकारी तक्रारी अर्जासंबंधातील संबंधीत यंत्रणांनी वेळेवर तक्रारी निकाली काढाव्यात, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, गरजू व्यावसायिक, नागरिक व शेतकरी यांनी सहकार खात्याकडून सावकारी परवाना घेतलेल्या सावकारांकडूनच कर्जाची रक्कम घ्यावी. परवाना नसतांना अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीस सावकारी अधिनियमाच्या कलम 39 अन्वये पाच वर्षाचा कारावास व 50 हजार रूपये इतक्या दंडाची तरतूद कायद्यात केलेली असून सदरचा गुन्हा हा दखलपात्र गुन्हा आहे. अवैध सावकारी प्रकरणी सन 2022 मध्ये एकूण 28 गुन्हे दाखल झालेले आहेत.

सावकारांच्या जाचाने पिडीत झालेल्या कर्जदारांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,सांगली, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर,सांगली (संपर्क दुरध्वनी क्र.0233-2600300 ईमेल- ddr_sng@rediffmail.com किंवा sangliddr@gmail.com) यांच्याकडे अथवा संबंधीत तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी योग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!