सोलापूर : सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा केला जातो. दरवर्षी तो दिवस शाळेत साजरा करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना मिळत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी-आजोबांसोबत घालवतात. आजी-आजोबा हे नातवंडांची पहिले मित्र असतात. नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी-आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नाते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आणि प्रेरणादायी आहे, असे सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
मुलांना शाळेबरोबरच आजी-आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी हा दिवस साजरा होणं आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी तो साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने यावर्षी १० सप्टेंबर २०२३ रोजी ‘आजी-आजोबा’ दिवस आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि शाळास्तरावर त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात यावा. तसेच या प्रस्तावित दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन शाळेला करता आले नाही तर शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस ‘आजी-आजोबा’ दिवस म्हणून साजरा करावा, असे शासन निर्णयात म्हटले आहे.