मुंबई : डॉ. रणजित पाटील यांना तुम्ही आमदार करा, त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद नक्की आहे, असा प्रचार भाजपच्या एक-दोन नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केला आणि भाजपच्या अमरावती विभागातील आमदारांच्या भुवया ताणल्या गेल्या. पाटील यांच्या पराभवासाठी त्यांचे हे संभाव्य मंत्रिपद कारणीभूत ठरले, अशी जोरदार चर्चा प्रदेश भाजपच्या वर्तुळात आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाटील हे गृह, सामान्य प्रशासन आणि नगरविकास अशा अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री होते. ‘फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती’ अशी त्यांची ओळख आहे.

आ. रामदास आंबटकर हे भाजपचे विधान परिषद सदस्य असून पाटील यांची पक्षपातळीवर प्रचाराची धुरा त्यांच्याकडे होती. पाटील यांचे मंत्रिपद नक्की आहे असे सांगणे त्यांनी सुरू केले. पाटील यांना विजयासाठी मदत व्हावी या हेतूने केलेला हा प्रचार त्यांच्या अंगलट आल्याचे मानले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
डॉ. रणजित पाटील विरुद्ध पूर्ण भाजप असे चित्र अकोला जिल्ह्यात पहिल्यापासूनच आहे. ते कायम राहिल्याचे निकालावरून दिसते. पाटील यांची निष्क्रियता, जुन्या पेन्शन योजनेची जोरदार मागणी, मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी प्रभावीपणे राबविलेली प्रचार यंत्रणा हीदेखील पाटील यांच्या पराभवाची कारणे मानली जातात.