दक्षिण अमेरिकन देश चिलीच्या जंगलात भीषण आग लागली आहे. या आगीमुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून चिलीचे १४ हजार हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. परिस्थिती पाहता चिली सरकारने याला राष्ट्रीय आपत्ती घोषित केले आहे. या भीषण आगीमुळे संपूर्ण देशात उष्ण वारे वाहत आहेत. राजधानी सॅंटियागोच्या दक्षिणेस सुमारे ५०० किमी अंतरावर असलेल्या बायोबिओ प्रदेशातील सांता जुआना या शहरात एका अग्निशामक दलाचा कर्मचाऱ्यासह १३ जणांचा मृत्यू झाला.

तसेच चिलीच्या दक्षिणेकडील भागात मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या हेलिकॉप्टरच्या अपघातात पायलट आणि मेकॅनिकचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. त्यामुळे संकटात आणखी वाढ झाली आहे. सरकारने बायोबिओ आणि नुबल भागात आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे, त्यानंतर या भागात सैन्य आणि इतर संसाधने तैनात करण्यात आली आहेत.
देशभरात आगीच्या अशा ३९ घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये हजारो घरे उद्ध्वस्त झाल्याचे गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितले. आगामी काळात परिस्थिती आणखी बदलू शकते, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या मदतीने ६३ विमानांचा ताफा आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.