खानापूर : प्रेम प्रकरणातून वाई तालुक्यातील खानापूर येथील मोलमजुरी करणाऱ्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. अभिषेक रमेश जाधव (वय २०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. वाई तालुक्यात एका महिन्यात दुसरा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, परखंदी गावातील काही लोक शुक्रवारी सकाळी शेताकडे जात असताना त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती तातडीने वाई पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाजवळ असलेल्या कागदपत्राच्या आधारे हा युवक खानापूर येथील अभिषेक जाधव असल्याचे समोर आले.
दरम्यान, खानापूर गावाने त्वरित ग्रामसभेचे आयोजन करून गाव बंदचा निर्णय घेत दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तींना गावात प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, अधिक तपास वाई पोलिस करीत आहेत.