२२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेला गोल्डमॅन अटकेत : सोन्याचा शर्ट घालून फिरत असल्याने आला होता चर्चेत
नाशिक : येवला तालुक्यातील गोल्डमॅन पंकज पारख यांनी ४ किलो पेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट बनवून पुण्यातील फुगे यांचे रेकॉर्ड ब्रेकच केले नव्हते तर गिनीज बुकातही स्वतःच्या नावाची नोंद केली. त्यामुळे, तब्बल सव्वा कोटींचा शर्ट परिधान करणारा हा गोल्डमॅन चांगलाच चर्चेत होता. आता, पंकज पारख यांना एका घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. पंकज पारिख संचालक असलेल्या पतसंस्थेमध्ये 22 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारख यांना अटक केली. पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि संचालक मंडळाच्या विरोधात सहायक निबंधक प्रताप पाडवी यांनी तक्रार दिली होती.

येवला येथील कै.सुभाषचंद्र पारख पतसंस्थेच्या 17 संचालक मंडळावर 21 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप बँकेचे प्रशासक व सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी केला आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी पारख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घेऊन गेले असून शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.