आजकाल शेतीत काही राहिले नाही असे म्हणत शेतकरी शहराकडे वळू लागले आहेत. यामुळे आज जगाचा पोशिंदा धोक्यात आलाय, पण उद्या जग धोक्यात येणार आहे हे नक्की. काही शेतकरी शेतीतून काही रुपये किंवा तोट्यात कमाई करत आहेत, तर काही लाखो, करोडोमध्ये करत आहेत. अशाच प्रकारची एक वेगळी शेती चीनमधील एका गावातील लोक करत आहेत. महत्वाचे म्हणजे ते सर्व श्रीमंत बनले आहेत. चीनमधील एका गावात चक्क सापांची शेती केली जाते. चीनच्या झेजियांग प्रांतातील जिसिकियाओ गावातील लोक साप पाळून आपला उदरनिर्वाह चालवितात. या गावातील सापांना अमेरिका, रशियासह कोरिया, जर्मनासारख्या देशांत मोठी मागणी आहे.

भारतातील सापांना धार्मिक महत्त्व आहे. जगातील सर्वात धोकादायक आणि प्राणघातक प्राण्यांमध्ये सापांची गणना प्रथम केली जाते. सापाचा एक दंश माणसाला पाणीही मागू देत नाही एवढे ते विषारी असतात. मग पाळायचे कसे, शेती कशी करायची? विचार करून अंगावर काटे आले असतील.जिसिकियाओ गावात 30 लाखांहून अधिक साप पाळले जात आहेत. या गावात 1980 पासून पारंपरीक शेती न करता साप पालनाचा व्यवसाय केला जात आहे. गावात 100 हून अधिक फार्म आहेत. कोब्रा, अजगर, वाइपर, रॅटल सारख्या विषारी आणि बिनविषारी 3 दशलक्ष सापांची पैदास केली जाते. गावातील 1000 हून अधिक लोक आता सापशेतीतून आपला उदरनिर्वाह करतात.
सापपालनासाठी काचेच्या किंवा छोट्या लाकडी पेटीत सापांची पिल्ले पाळली जातात. सापाची अंडी हिवाळ्यात उबवतात आणि काही काळानंतर त्यातून पिल्ले बाहेर येतात. मोठी झाल्यानंतर ती प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करून अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, जर्मनी यांसारख्या देशांमध्ये विकली जातात. चीनच्या झेजियांग प्रांतातील जिसिकियाओ गावात सापांचे विविध भाग बाजारात चढ्या भावाने विकले जातात. यातून चिन्यांना चांगला पैसा मिळतो. या गावात सापांचा कत्तलखानाही आहे. हे साप सुकविलेही जातात. कॅन्सरचे औषध किंवा केमो हे सापाच्या विषापासून बनवले जाते. तसेच चीनमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या आणि आजारांवर उपचार करण्यासाठी सापाच्या विषाचा वापर केला जातो.
हे चिनी लोक एवढे साप पाळत असले तरी ते एका सापापासून जाम घाबरतात. फाइव्ह स्टेप हा असा साप आहे, ज्याला अख्खा चीन घाबरतो. हा फाईव्ह स्टेप साप जर एखाद्याला चावला तर त्या वक्तीचा पाच पाऊले टाकताच मृत्यू होतो, असे म्हटले जाते. भारतात साप पालनाला विरोध आहे. त्याचे विषही काढण्यास कायदेशीर परवानगी नाही. यामुळे सापांची तस्करी, विषाची तस्करी आदीचे गुन्हे घडत असतात.