नवी दिल्ली – भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आणखी एक नवा अध्याय लवकरच जोडला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालय आपल्या इतिहासात प्रथमच येत्या ४ फेब्रुवारीला आपला स्थापना दिवस साजरा करणार आहे.

यंदाच्या ७३ व्या स्थापना दिनापासून सर्वोच्च न्यायलयात ही एक नवीन परंपरा सुरू होत आहे. सिंगापूरचे सरन्यायाधीश न्या. सुंदरेश मेनन समारंभाचे प्रमुख पाहुणे असतील. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘बदलत्या जगात न्यायपालिकेची भूमिका’ या विषयावर विशएष व्याख्यान होणार आहे.
ता. २६ जानेवारी १९५० रोजी भारत सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनल्यानंतर दोन दिवसांनी २८ जानेवारी १९५० रोजी सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना राज्यघटनेच्या भाग ५ प्रकरण ४ अंतर्गत करण्यात आली आहे. राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालय हे न्यायपालिका या लोकशाहीचा स्तंभाचे आणि घटनेचे संरक्षक आहे.
सिंगापूरचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती मेनन भारतीय वंशाचे आहेत. न्या. चंद्रचूड यांच्या कल्पनेनुसार नव्या युगात देशातील प्रत्येक नागरिकाला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की बदलत्या काळात न्यायव्यवस्था कशी काम करत आहे? तसेच जगभरात न्यायव्यवस्था कशी चालते? नागरिकांनी विशेषत: तरुणांनी याच्याशी जोडले गेले पाहिजे आणि जागरूक झाले पाहिजे. जगभरातील कायदेतज्ज्ञांनी या सर्वोच्च व्यासपीठावर वेळोवेळी आपले विचार मांडले आहेत. हा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने येत्या शनिवारी स्थापना दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.