जळगाव : बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर आवश्यक दस्तऐवज बनावट तयार करून ते खरे असल्याचे भासवून कोट्यवधीची मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने छळा लावला आहे. डॉ. अनिता राजेंद्र नेहते यांच्या मालकीचे आयोध्यानगरातील कोट्यवधी रुपयांचे तीन प्लॉट परस्पर नावे लावून विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या टोळीसह सूत्रधार महिला संशयीतास गुन्हेशाखेने शिताफीने अटक केली आहे.

अयोध्यानगरात सर्वे क्रमांक १४० मधील प्लॉट नंबर ३३, ३४ आणि ३५ हा बखळ प्लॉट डॉ. अनिता राजेंद्र नेहते यांच्या मालकीचा आहे. त्या बाहेरगावी राहत असून, त्यांचे डॉक्टर भावाकडे येणे-जाणे असते. त्यांच्या मालकीचे तिन्ही प्लॉट परस्पर नावावर लावून ते विकून प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा मलिदा लाटण्याचा घाट शहरातील एका टोळीने रचला होता. संपूर्ण कागदोपत्री तयारी करून व्यवहार होणार, याची भनक स्थानिक गुन्हे शाखेला लागली. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या पथकातील विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, संदीप ढाकणे, अभिलाषा मनोरे, विजय पाटील, रवींद्र पाटील यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून संशयितांची माहिती संकलीत केली.
मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यावर नियोजनबद्ध झडप घालत राजू जगदेव बोबडे , प्रमोद वसंत पाटील, गंगा नारायण जाधव या तिघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्या तिघांना अटक करून निरीक्षक विजकुमार ठाकूरवाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रतन गिते यांना सोपविण्यात आले असून, रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.