सांगली : वानलेसवाडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विजयनगर, सांगली या ठिकाणी दि. 27 जानेवारी 2023 रोजी 34-35 विद्यार्थ्यांना भात व आमटी सेवन केल्यानंतर उलटी मळमळ व चक्कर येणे असा त्रास जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय सांगली येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. सदर अन्नपदार्थ पुरविलेल्या मे. हौसाबाई तातोबा रूपनर महिला बचत गटाकडील अन्नपदार्थांचा साठा जप्त करून त्यांना अन्न पदार्थांचा अहवाल येईपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.
विद्यार्थ्यांना शाळेतर्फे पुरविण्यात आलेल्या भात व आमटी याचा ठेका चैतन्यनगर सांगली येथील मे. हौसाबाई तातोबा रूपनर महिला बचत गटास देण्यात आल्याचे चौकशीदरम्यान निर्दशनास आल्याने तात्काळ ठेकेदाराकडून भात, आमटी व डाळ चे नमुने तपासणीसाठी घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ठेकेदाराकडून 4 हजार 636 रूपये इतक्या किंमतीचा भात आमटी व डाळ असा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यातील नाशवंत पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. अन्न पदार्थांचा अहवाल येईपर्यंत मे. हौसाबाई तातोबा रूपनर महिला बचत गटास व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती हिरेमठ यांनी केली.
