उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात एका शाळेच्या ११ विद्यार्थिनी अचानक बेशुद्ध पडल्या त्यातील ४ जणींची तब्येत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्गात शिकताना एका पाठोपाठ एक मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर या मुलींना तातडीने लखनौच्या ट्रामा सेंटरला उपचारासाठी नेले. या शाळेच्या संरक्षक भिंतीशेजारी असलेल्या स्मशान भूमीत भंगारवाल्याकडून काही औषधे जाळण्यात आली. त्यामुळे विषारी वायू निर्माण झाला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली.

कोतवाली परिसरातील किंग जॉर्ज इंटर कॉलेजमध्ये वर्गात शिकताना अचानक मुली बेशुद्ध पडू लागल्या. एका पाठोपाठ एक अशा ११ मुली बेशुद्ध झाल्या. काही शिक्षकही चक्कर येऊन कोसळले. या घटनेत जवळपास १५-२० लोकांची तब्येत बिघडली. या घटनेने खळबळ माजली. तात्काळ शाळा प्रशासनाने स्थानिक रुग्णालयात या सर्वांना उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहचले. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित युवकाला अटक केली आहे.
त्यानंतर ४ गंभीर विद्यार्थिंनीना लखनौच्या ट्रामा सेंटरला उपचारासाठी नेले. अचानक दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने सुरुवातीला काहीच समजले नाही. त्यानंतर जेव्हा आम्ही याचा शोध घेतला तेव्हा भंगारवाल्याने काही औषधे जाळली होती. ज्यामुळे विषारी वायू निर्माण झाला. त्यामुळे अनेक बेशुद्ध पडले असे त्यांनी म्हटले. तर शाळेत वर्गात शिकताना अचानक दुर्गंध आला. त्यामुळे आम्हाला श्वासही घेता येत नव्हता. उलटी आली. सर्व दहशतीचे वातावरण होते. वर्गात गोंधळ उडाला होता असे पीडित विद्यार्थिनीने सांगितले.