भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेसाठी कांगारूंचा संघ भारतात दाखल झाला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ भारतीय भूमीवर चार कसोटी सामने खेळणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीची पहिली कसोटी 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. याच कारणामुळे ऑस्ट्रेलियन संघ जवळपास एक आठवडा आधीच भारतात पोहोचला आहे. मात्र संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा सध्या भारतात आलेला नाही.

उस्मान ख्वाजा अजूनही ऑस्ट्रेलियातच आहे. तथापि मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आशा आहे की उस्मान ख्वाजाचा व्हिसा मंजूर होईल आणि तो गुरुवारी 2 फेब्रुवारी 2023 ला भारतात जाईल. उस्मान ख्वाजाला भारताचा व्हिसा मिळाला नाही, तर भारतात कसोटी क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहू शकते. उस्मान ख्वाजाने आतापर्यंत भारतीय भूमीवर एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिले की, “मी माझ्या भारतीय व्हिसाची वाट पाहत आहे.” पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या ख्वाजाने ऑस्ट्रेलियासाठी 56 कसोटी, 40 एकदिवसीय आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 36 वर्षीय फलंदाजाने 2016 मध्ये आयपीएलमध्ये भाग घेतला होता. ख्वाजा यांना सोमवारी ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून निवडण्यात आले. हा पुरस्कार अनुभवी फिरकीपटू शेन वॉर्नच्या नावावर आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
• पहिली कसोटी – 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
• दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
• तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च, धर्मशाला
• चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च, अहमदाबाद