मुंबई : मुलुंडमधील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट चिराग विनोदराय वरैया (वय ४५) यांनी इगतपुरी येथील हॉटेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांची चौकशी झाली.
अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असतानाच त्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. नेमक्या कुणाच्या दबावाखाली त्यांनी टोकाचे पाऊल उचलले ? याबाबत तपास सुरू आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी नोंद करत घटनास्थळावरून दोन पानी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. सुसाईट नोटमध्ये ‘बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करत सत्य लवकरच समोर येईल,’ असे नमूद केले आहे.

मुलुंडमध्ये चिराग यांची ‘चिराग वरैया आणि कंपनी’ आहे. १० जानेवारी रोजी त्यांच्या विरोधात भांडुप पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यात २६ जानेवारी रोजी ते भांडुप पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. शनिवारी ते चालकासोबत त्यांनी इगतपुरी येथील मित्राच्या मानस प्रोजेक्ट हॉटेल विवांतमध्ये थांबले.
सोमवारी निघायचे असल्याने चालकाने चिराग यांना कॉल करण्यास सुरुवात केली. दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद आला नाही. त्यांना संशय आल्याने बनावट चावीने प्रयत्न सुरू केले.
मात्र आतून लॉक असल्याने दरवाजा उघडण्यास अडचणी आल्या.
अखेर, इगतपुरी पोलिसांशी संपर्क साधताच त्यांनी खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.