Andhra Pradesh Capital : आंध्रप्रदेशच्या ‘नव्या’ राजधानीची मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली घोषणा
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या राज्याच्या नवीन राजधानीची घोषणा केली असून आता विशाखापट्टणम ही राज्याची नवीन राजधानी असणार आहे. येत्या 3 आणि 4 मार्च रोजी आंध्र प्रदेशमध्ये जागतिक गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंबंधित आयोजित केलेल्या दिल्लीमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ही घोषणा केली.
यावेळी बोलताना वायएस जगन मोहन रेड्डी म्हणाले, आम्ही 3 आणि 4 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे जागतिक शिखर परिषद आयोजित करत आहोत. मी तुम्हाला वैयक्तिकरित्या शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यासाठी आलो आहे. विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी आमच्या नव्या राजधानीला भेट द्यावी आणि आंध्र प्रदेश राज्यात व्यवसाय करणे किती सोपे आहे ते पहावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री रेड्डी यांनी केले आहे. या पूर्वीच मुख्यमंत्री रेड्डी यांनी विशाखापट्टणम हे राज्य प्रशासनाचे प्रमुख ठिकाण म्हणून प्रस्तावित केले होते. मुख्यालय म्हणून हेच राज्याच्या राज्यपालांचे ठिकाणही असेल. परंतु विधिमंडळाचे कामकाज अमरावतीतून चालणार आहे.

‘विशाखापट्टणम’ला आंध्र प्रदेशची नवी राजधानी घोषणा करण्याआधी कृष्णा नदीच्या काठावरील अमरावती ही राजधानी म्हणून घोषणा करण्यात आली होती. परंतु ती रद्द करून विशाखापट्टणमला नवीन राजधानीची मान्यता देण्यात आली आहे. (स्त्रोत एबीपी माझा)