मोठी ध्येये ठरवून ती पूर्ण करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असेल, तर अशक्य ते शक्य होऊ शकते. बिहारच्या सहरसा जिल्ह्यातल्या रिक्षाचालकाची ही कहाणी तशीच आहे. एक वेळ पोट भरण्यासाठी रिक्षा चालवण्याचंही काम केलेल्या दिलखुश कुमार याची आता स्वतःची कॅब कंपनी आहे. या कंपनीद्वारे जवळपास 4 हजार गाड्या रस्त्यांवर धावत आहेत. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दिलखुश कुमार याने स्वतःची स्टार्टअप कंपनी स्थापन केलीय. ‘नवभारत टाइम्स’ने त्याबाबतचे वृत्त दिले आहे. राजधानी पाटणाच्या रस्त्यांवर धावणाऱ्या 3200 कॅब आता दिलखुश कुमारच्या कंपनीशी जोडल्या गेल्या आहेत. 2023च्या अखेरीपर्यंत 25 हजार गाड्या समाविष्ट करण्याचा त्याचा संकल्प आहे.

शिक्षण पूर्ण केल्यावर दिलखुशला खासगी शाळेत शिपाई व्हायचे होते. तसे प्रयत्नही त्याने केले. पण काम न झाल्याने रोजगार मिळवण्यासाठी तो दिल्लीला गेला. दिल्लीमध्ये रिक्षा चालवण्याचे काम तो करू लागला; मात्र तिथे आजारी पडल्यामुळे त्याने पुन्हा सहरसा गाठले. काही वेगळे करण्याचा निश्चय करून 2016मध्ये स्टार्टअप योजनेअंतर्गत साडेपाच लाखांचे कर्ज त्याने घेतले. रोडबेझ वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण्यासाठी गाड्या उपलब्ध करून देते. दिलखुश कुमार याने स्टार्टअप योजनेअंतर्गत कर्ज घेऊन त्यातून कॅबसेवा सुरू केली. आज त्याची कंपनी अनेक प्रवाशांसाठी फायदेशीर ठरते आहे. तसेच स्वतःसोबत त्याने अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यापुढे आणखी गाड्या स्वतःच्या कॅब सेवेत समाविष्ट करून घेण्याचा त्याच्या कंपनीचा मानस आहे.
दिलखुशच्या नावाप्रमाणेच त्याचा प्रवासही मन प्रसन्न करणारा आहे. फारसे शिक्षणही नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर त्याने स्वतःचे करिअर घडवले. तिशीच्या आतच त्याने स्वतःच्या 2 कंपन्या स्थापन केल्या आहेत. अनेक होतकरू तरुणांसाठी त्याची यशोगाथा आदर्श ठरू शकते.