कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यात अनेक तरुण नैराश्यात गेल्याचे आपण पाहिले असेल मात्र, नोकरी गेली तरी हार न मानता वर्धा येथील दोन भावंडांनी दुग्ध व्यवसाय उभारला आहे. दोन गाईंपासून सुरू केलेला व्यवसाय आता 19 गाईंपर्यंत पोहचला असून दूध विक्रीतून स्वावलंबी अर्थकारण उभे केले आहे. प्रणय आणि देवानंद गिरडे असे या भावंडाची नाव आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील या भावंडांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण आहे. त्यांना पुण्यात नोकरी देखील मिळाली होती. मात्र, कोरोना काळात त्यांची नोकरी सुटली. यानंतर त्यांनी गावी स्वतःचा व्यवसाय उभारावा म्हणून काम सुरू केले. आपल्या वडिलांच्या दोन गायी पासून आपल्या दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली.

व्यवसायाच्या सुरुवातीला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळामध्ये माहीत नव्हतं की काय करायला पाहिजे, गुरांची काळजी कशी केली पाहिजे, त्यांना पोषक आहार कसा दिला पाहिजे त्यासोबतच गाईने दूध जास्त द्यावे यासाठी कोणत्या चारा देणं योग्य आहे. अश्या कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना नव्हती मात्र हार न मानता सर्व माहिती मिळवली. सोबत ती अमलात आणली व अडचणींवर मात केली. लम्पी आजार येऊन गेला. हा आजार गायींवर प्रभाव टाकत होता. यावेळी होतकरू तरुणांनी न घाबरता पशुधनाची योग्य काळजी घेतली. याचा परिणाम असा झाला की एकीकडे जिल्ह्यात मोठा प्रमाणात लम्पी आजाराचा कहर होता.
या सर्व अडचणीचा सामना करत व्यवसायात प्रगती केली. दोन गाईवरून या व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या या तरुणांचा दुधाचा व्यवसाय मोठे यश संपादन केले. सद्यःस्थितीत त्यांच्याकडे लहान मोठ्या अश्या जवळपास 15 गायी आहेत. यामध्ये दूध देणाऱ्यास 8 गाई आहेत. याचे दररोज 80 ते 90 लीटर दूध निघते. यामधून साधारण नोकरीच्या तुलनेत ते जास्त पैसे कमवायला लागले आहेत. नुसत्या दुधाच्या भरवश्यावर ते महिन्यात 40 ते 50 हजार रुपयांची कमाई होत आहे.