Shubhangi Crime News : डॉक्टर मुलीचा गळा घोटण्यासाठी पत्नीला पाठविले मेव्हण्याकडे : शुभांगी जोगदंड हत्या प्रकरणात नवा खुलासा
नांदेड : महिपाल पिंपरी येथील डॉ. शुभांगी जोगदंड हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. 22 जानेवारी रोजी शुभांगीचे वडील जनार्दन जोगदंड यांनी शुभांगीचा गळा घोटण्यापूर्वी तिच्या आईला मामाकडे पाठविले होते. त्यानंतर शुभांगीचा खून करून तिचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा बनाव केला होता.
नांदेड पोलीस या प्रकरणाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करीत आहेत. शुभांगीचे गावातील नात्यात असणाऱ्या मुलाशी असणारे प्रेम प्रकरण कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळेच तिचे लग्न जुळविण्याचे चालले होते. परंतु शुभांगीच्या प्रियकराने नियोजित वराला आपल्या प्रेमसंबंधाची माहितीदिल्याने शुभांगीची सोयरीक मोडली.

गावात आपली बदनामी झाल्याचा राग तिचे वडील जनार्दन जोगदंड आणि भावाला होता. त्यातूनच त्यांनी शुभांगीचा कायमचा काटा काढला. 22 जानेवारी रोजी शुभांगीच्या आईला गावातीलच मामाकडे पाठविले. त्यानंतर मध्यरात्री गाव सामसूम झाल्यानंतर शुभांगीचा गळा घोटण्यात आला. शुभांगीच्या हत्या केल्यावर काही वेळानंतर माध्यरात्रीलाच आरोपींनी शुभांगीचे प्रेत खताच्या पोत्यात भरून शेतात नेले. तिच्या देहाला अग्नी देण्यापूर्वी शुभांगीचा मामा तिच्या आईला घेऊन थेट शेतात पोहोचला. यावेळी शुभांगीच्या वडिलांनी विजेवरील शेगडी पेटवित असताना शॉक लागून शुभांगीचा मृत्यू झाल्याचे तिच्या आईला सांगत अंत्यदर्शन घेण्यासाठी तिच्या आईला फक्त शुभांगीचा चेहरा दाखविला आणि आईला मुलीचे शेवटचे अंत्यदर्शनही पूर्ण होऊ दिले नाही.