पुणे: पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नेहमीप्रमाणे सकाळ धावण्याचा सराव करणाऱ्या येथील तरुणासाठी आजची सकाळ मात्र काळ बनून आली. रस्त्यावरून पळत असताना वाहनाच्या धडकेत कजगावच्या रोहित मराठे या तरुणाचा मृत्यू झाला.

रोहित अशोक मराठे हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत भडगाव रस्त्यावर ‘माॅर्निक वाॅक’साठी जात असताना चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बालाजी पेट्रोल पंपाजवळ रोहितला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रोहित मराठे याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अंधाराचा फायदा घेत अपघाताला कारणीभूत असलेले वाहन घेऊन चालक फरार झाला.
रोहित हा भडगाव येथील न्यू इंग्लिश माध्यमिक शाळेत बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. व्यायामाचा सराव सुरू होता. मात्र नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावणाऱ्या रोहितची सकाळ जणू काळ ठरली. ही घटना संपूर्ण गावातील नागरिक व रोहीतच्या मित्रांना धक्का देणारी आहे.
रोहित मराठे याचा मृतदेह घरी आणल्यानंतर आई, वडिलांनी रोहितला पाहताच हंबरडा फोडला. या वेळी उपस्थित नागरिकांना देखील अश्रू अनावर झाले होते. या वेळी रोहीतच्या मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सायंकाळी साडेपाचला शोकाकुल वातावरणात रोहितवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.