माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : महारवतनाची जमीन विक्री परवानगीसाठी दिड लाख रूपयाची लाच स्विकारताना सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून लोकसेवक अनंता विठ्ठलराव भानुसे, (वय ५१,रा.सांगली) यांना पकडले,तर लिपिक कम डाटा इंट्री ऑपरेटर दिलीप निवृत्ती देसाई (रा.ढवळी) यांनी भानुसे यांना लाच देण्यास प्रोत्साहन दिले म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले.सांगलीच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने भानुसे यांना रंगेहाथ पकडले.
अधिक माहिती अशी,तक्रारदार खरेदी करणार असलेल्या जमीनीचे मालक यांनी त्यांची महारवतनाची जमीन विक्री करण्याची परवानगी मिळणे बाबत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांना दिलेला अर्ज वरीष्ठांना सांगुन मंजुर करुन देण्यासाठी स्वतःकरीता व वरीष्ठांचेकरीता दोन लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.१९ जानेवारी रोजी अँन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक अनंता विठ्ठलराव भानुसे अव्वल कारकून यांनी तक्रारदार हे खरेदी करणार असलेल्या शेतजमीनीचे मालक यांनी महार वतनाची जमीन विक्री करण्याची परवानगी मिळणेकरीता दिलेला अर्ज वरीष्ठांना सांगुन मंजुर करण्यासाठी २ लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती दिड लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. तसेच लोकसेवक श्री. दिलीप निवृत्ती देसाई यांनी तक्रारदार यांना लोकसेवक भानुसे यांना लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आज दि.३० जानेवारी रोजी लोकसेवक श्री.भानुसे, अव्वल कारकून यांचे विरूध्द जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथील अल्पोउपहार गृहाच्या आवारात सापळा लावला असता, लोकसेवक श्री.भानुसे यांना तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून दिड लाख रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच लोकसेवक श्री देसाई यांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्या अनुषंगाने भानुसे, व देसाई यांचे विरुध्द विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस उपआयुक्त अमोल तांबे, सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सरदार नाळे,पोलीस निरिक्षक दत्तात्रय पुजारी,विनायक भिलारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.