जळगाव : हद्दपार गुन्हेगाराने सुप्रीम कॉलनीतील ५८ वर्षीय वृद्धाकडे पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही म्हणून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दोन्ही हात फ्रॅक्चर केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

सुप्रीम कॉलनीतील रहिवासी गोपाळ राजाराम सपकाळे रामदेवबाबा मंदिराजवळ कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. २२ नोव्हेंबरला मध्यरात्री साडेबाराला गोपाळ सपकाळे प्रातर्विधीसाठी गेले असताना त्यांना वाटेतच अडवून सोनूसिंग राठोड याने पैशांची मागणी केली.
पैसे देण्यास नकार दिल्याने लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला करून दोन्ही हात मोडून संशयित फरारी झाला होता. गेल्या देान महिन्यांपासून त्याचा शोध सुरू असताना संशयित सोनूसिंग सुप्रीम कॉलनीत आल्याची गुप्त माहिती निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, महेंद्रसिंग पाटील, सुधीर सावळे, सचिन पाटील, विशाल कोळी, मुकेश पाटील पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.