कोल्हापूर: दिल्ली, आसाम, बंगाल आणि महाराष्ट्र अशा चार राज्यांतील तब्बल पाच आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात कोल्हापुरातील तरुण रंगकर्मींनी ‘आलोरगान’ या नाटकाचे सादरीकरण करून कोल्हापूरच्या शिरपेचात नवा तुरा खोवला आहे. या नाटकाने घेतलेली ही झेप प्रशंसनीय आहे.

टायनी टेल्स थिएटर कंपनी निर्मित, कोल्हापुरातील नामांकित सर्जनशाळा, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत ‘आलोरगान’ हे कोल्हापूरचे नाटक आसाममध्ये पार पडलेल्या ‘अंडर द साल ट्री’ या प्रतिष्ठित नाट्यमहोत्सवात भारतभरातून आणि बाहेरच्या देशातून निवडल्या गेलेल्या सात नाटकांमध्ये सादर झाले.
आसाममधल्या गोलपारा या जिल्ह्यात भरणारा हा नाट्यमहोत्सव ‘शुक्राचार्य राभा’ यांनी सुरू केला. आपले जंगल, जमीन, आपल्या इथली झाडे, संस्कृती टिकून राहावी म्हणून चळवळ म्हणून हा नाट्यमहोत्सव सुरू झाला. गेली १३ वर्षे सातत्याने शुक्राचार्य राभा आणि त्यानंतर मदन राभा हा महोत्सव भरवतात. या नाट्यमहोत्सवात लाईट्स, माईक अशा कोणत्याच गोष्टी वापरल्या जात नाहीत.
देशभरातील विविध नाट्यमहोत्सवात सादर होणाऱ्या ‘आलोरगान’ नाटकासाठी दहाजणांचा चमू सगळ्यात तरुण मानला गेला आहे. याव्यतिरिक्त बंगालच्या रंगयात्रा आणि दिलीप मुखोपाध्याय स्मृती नाट्यमहोत्सव, दिल्लीतील दिल्ली इंटरनॅशनल आणि महाराष्ट्रातील पुण्यातील नाट्यसत्ताक या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात हे नाटक सादर करण्यात आले. आता साताऱ्यातील फोक थिएटरच्या आर्ट कल्चर या नाट्यमहोत्सवात हे नाटक सादर होणार आहे.