सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सध्या सुरू आहे. या परीक्षांची उत्तरपत्रिका तपासणी हाताने नव्हे तर संगणकावर ऑनस्क्रिन केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात १७ केंद्रे स्थापन केली असून विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक संगणकावर पेपर तपासत आहेत.

उत्तरपत्रिका तपासणीतील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, त्यावर हाताने खाडाखोड करता येवू नये आणि वेळेची बचत व स्पष्टता, पारदर्शकता राहावी या प्रमुख हेतूने सोलापूर विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे. यंदा पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांची संगणकावर ऑनस्क्रिन तपासणी केली जात आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी १०९ महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठातील कॅम्पस व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या पाहता प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीला खूप वेळ लागायचा. त्यामुळे निकाल विलंबाने लागल्याने अनेक विद्यार्थ्यांना जॉब तथा पुढील शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.
निकाल जलदगतीने जाहीर व्हावा या उद्देशाने विद्यापीठाने यावर्षीपासून १०० ऑनस्क्रिन मूल्यमापन सुरू केले आहे. किमान २५ संगणक व इंटरनेटची सुविधा असलेल्या १७ महाविद्यालयांमध्ये ऑनस्क्रिन मूल्यमापन केंद्रे असतील.