मुंबई: एका जैन मंदिरामध्ये क्राईम पेट्रोल पाहून एका व्यक्तीने चोरी केल्याची घटना घडली आहे. चोरीचा हा प्रकार पाहून पोलिसही अचंबित झाले आहेत. आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. आरोपी जैन साधूचा वेष धारण करून मंदिरात चोरी करत असे. पूजेच्या बहाण्याने आरोपी मंदिरात जायचा आणि चोरी करायचा. भरत सुखराज दोशी असे आरोपीचे नाव असून तो रामचंद्र लेन मालाड रहिवासी असून जुगार खेळण्यासाठी तो चोरी करत असे.

मुंबईच्या मालाडमधल्या मंदिरात 160 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट गायब झाले. यानंतर मंदिरातील जैन साधू धीरज लाल शहा याने 23 जानेवारी रोजी दिंडोशी पोलिसांत ठाण्यात अज्ञात चोराविरोधात तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला. पोलिसांनी जैन मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरातील तब्बल 93 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर जैन साधूच्या वेश्यातीलच एक व्यक्ती ते सोन्याचे ताट घेऊन पळून गेल्याचे दिसून आले.
यानंतर दिंडोशी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यानेच जैन मंदिरातील सोन्याचे ताट चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे ताट आणि 160 ग्रॅम वजनाचा वितळवलेला सोन्याचा रॉड आणि स्कूटर जप्त केली आहे. ज्याची एकूण किंमत सुमारे 5 लाख 30 हजार आहे.