मुंबई : लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीला घेऊन २९ जानेवारी रोजी मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा संपन्न झाला. या मोर्चामध्ये भाजपा तसेच शिंदे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. याच मोर्चात सामाजिक कार्यकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते हेदेखील सहभागी झाले. त्यांनी मोर्चामध्ये सहभागी होत कथित लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यवर पातळी सोडत टीका केली. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, पाकिस्तानी लोकांच्या नीच विचारांमधून लव्ह जिहाद सुरू झाला आहे. या लव्ह जिहादला गाडण्यासाठी मुंबईत हिंदू समाज एकवटला आहे. लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा अशी आम्ही मागणी करतो. दाऊद इब्राहीमचा, बाबरचा विचार दफन करा. संत म्हणून आले आणि धर्मप्रचार करायला लागले आहेत, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावरदेखील पातळी सोडून टीका केली. “याच सर्व बाबी लक्षात घेता आज येथे हिंदू समाज एकवटला आहे. शरद पवार यांच्या तोंडाला आजार झालेला आहे. त्यांना दुसऱ्या विषयावर बोलायला सुचते. मग लव्ह जिहादच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत. हैदाबादचा मियाँभाई लव्ह जिहादवर का बोलत नाही,” असे गुणरत्न सदावर्ते म्हणत, “या सर्वांनाच प्रश्न विचारण्यासाठी, त्यांना उघडे पाडण्यासाठी तसेच लव्ह जिहादला ठोकरून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत,” असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.