गोंदिया : गोंदिया शहरातील एका १६ वर्षाच्या मुलीवर गोंदियापासून तर नागपूरपर्यंत सतत तीन दिवस सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन नराधमांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
गोंदिया शहरातील १६ वर्षाच्या एका मुलीला शहराच्या मामा चौकातून २४ जानेवारी रोजी उचलून तिला बांधतलाव येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दोन तासानंतर पुन्हा तिला मामा चौकात सोडण्यात आले. दुसऱ्याने लगेच तिला एमआयडी परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. रात्री ९ वाजताच्या सुमारास तिला पुन्हा मामा चौकात आणल्यावर तिला नागपूरच्या एका व्यक्तीकडे स्वाधीन करण्यात आले.

या प्रकरणात तीन नराधमांवर भादंविच्या कलम ३६३, ३७६, ३७६ (२), (एन), ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोन आरोपींना पकडण्यासाठी गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्वरीत पाऊले उचलली. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजने यानच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामभाऊ व्होंडे, पोलीस हवालदार अनिल कोरे यांनी आरोपींना अटक केली.