पनवेल : आपल्या पत्नीच्या दोन भावांना कारने पाठीमागून धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फैझल नाझीम अंसारी (२६) याच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहानवाज अब्दुल मलिक अन्सारी (१९) याची मोठी बहीण शहरीन हिचा विवाह २०२२ मध्ये फैझल नाझीम अंसारी यांच्यासोबत झाला. त्यांच्यात वारंवार वाद होत होते.
परवा शहनवाज आणि भाऊ मोहम्मद हे नमाजवरून घरी जात असताना एका कारने भरधाव वेगाने येऊन त्यांना पाठीमागून धडक दिली.यावेळी त्यांनी गाडीचा क्रमांक पाहिला असता ती फैझल यांची असल्याचे दिसले.

गाडीने पाठीमागून धडक दिल्याने शहानवाज आणि त्यांचा भाऊ मोहम्मद हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.