लातूर: सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोयाबीनच्या दरात जवळपास दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोयाबीनला बाजारात तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. या दरातून उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, 2022 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी फारसे चांगले राहिले नाही. अतिवृष्टी, पूर, परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय पिकावर कीड आणि रोगांचा देखील मोठा प्रादुर्भाव झाला आहे. अशातच महाराष्ट्रात हवामान बदलामुळं पपई, संत्रा आणि मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता सोयाबीनच्या दराबाबतही असेच संकट समोर आले आहे. सोयाबीनला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
राज्यात 9 ते 11 हजार रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीनची विक्री झाली होती. तेव्हा विक्रीतून शेतकऱ्यांना नफा मिळत होता. मात्र आता सोयाबीनचे दर गडगडले आहेत. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या दरानं सोयाबीन विकल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. त्यामुळं केंद्र सरकारने एमएसपी वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.