अहमदनगर : मेहनत, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षांत यश मिळतेच, हेच दाखवून दिले आहे एका नवविवाहित जोडप्याने. अहमदनगर जिल्ह्यातील सुरेश आणि मेघना चासकर यांची एमपीएससी स्पर्धेतील क्लासवन पदी त्यांची निवड झाली आहे.
एमपीएससी मार्फत वर्ष 2019, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पती-पत्नी एकाच वर्षी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे लग्नानंतरही या दोघांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच ठेवली होती. अखेर, प्रामाणिक प्रयत्नाला यश मिळालं असून दोघेहीही इंजिनिअर आता सरकारी विभागात अधिकारी बनली आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेतून या दोघांनीही सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पदाला गवसणी घातली. पती-पत्नीने एकाचवेळी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

सुरेश व मेघना हे दोघेही मे 2022 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर एक वर्षाच्या आतच दोघेही क्लासवन अधिकारी बनले आहेत. मेघना यांचे मूळ गाव कोपरगाव तालुक्यातील येसगाव आहे. तर, सुरेश हे सिन्नर तालुक्यातील सायाळ्याचे रहिवाशी आहेत. कुटुंबांचे पाठबळ व एकमेकांची साथ असल्यानेच त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे.