नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच आपल्या मुलीची हत्या केली. शुभांगी जोगदंड असं मयत मुलीचं नाव आहे . 23 वर्षीय शुभांगी BAMS मध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती. गावातील तरूणासोबत तिचे प्रेम संबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नवहतं. कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरे एक स्थळ पाहून तिचे लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आठच दिवसात हे लग्न मोडायला भाग पाडलं.
त्यामुळे गावात बदनामी झाली आणि याच रागातून आम्ही तिचा खून केल्याची कबुली कुटुंबियांनी दिली. रागाच्या भरात आपल्याच लेकीचा गळा आवळल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. रविवारी 22 जानेवारी रोजी रात्री शुभांगीची कुटुंबियांनी हत्या केली. तिचा मृतदेह शेतातच जाळला. तसंच बाजूच्याच ओढ्यात ती राख टाकून दिली.

शुभांगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. त्यामुळे मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चा सुरु झाली. शुभांगी नेमकी कुठे हरवली, याची शोधाशोध सुरु झाली. गुप्त बातमीदाराने यासंबंधी पोलिसांकडे माहिती दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हा प्रकार उघड केला. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्यावडील, मामा भाऊ आणि काकाची दोन मुलं अशा पाच जणांना अटक केली आहे.