हैदराबाद: बीबीसीच्या गुजरात दंगलीवरील माहितीपटावरून देशातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी आणल्यानंतर ‘स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’कडून हैदराबाद विद्यापीठात या माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. याचा विरोध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदनेही ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग केले आहे. यावेळी दोन्ही गटातील विद्यार्थी आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत गुरुवारी रात्री ‘स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’कडून हैदराबाद विद्यापीठात या माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी विद्यापीठातील ४०० विद्यार्थी हजर असल्याचा दावा एसएफयाकडून करण्यात आले. बीबीसीच्या माहितीपटाविरोधात अभाविपकडूनही वसतीगृहाच्या कॅम्पसमध्ये विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल’चे स्क्रिनिंग करण्यात आले.
या चित्रपटात काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याराचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठ प्रशासनाने बीबीसीच्या माहितीपटाला परवानगी दिली मात्र, आम्हाला परवानगी दिली नाही, असा आरोपही अभाविपकडून करण्यात आला. २१ जानेवारी रोजी हैदराबाद विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी बीबीसीच्या माहितीपटाचे स्क्रिनिंग आयोजित केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले.