महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आजपासून उपलब्ध होत असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली. माहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या १२ वीची परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये होणार असून या विषयीचे ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करण्यात आले आहे.

आज सकाळी ११ वाजेपासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकीट उपलब्ध असणार आहेत. www.mahahssscboard.in या वेबसाइटवर हे हॉलतिकीट्स उपलब्ध आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२३साठी १२ वीच्या परीक्षेचे ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट काढून घ्यायची आहेत. हे प्रिंट काढताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये असे मंडळाने सांगितले आहे. या प्रिंटवर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असे बोर्डाने नोटीसमध्ये सांगितले आहे.
हॉल तिकीट हरवले तर?
हॉल तिकीट विद्यार्थ्याकडून हरवले तर संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने पुम्ही प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्याला प्रवेश द्यावा. फोटो सदोष असल्यास विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी सही शिक्का मारावा, अशाही सुचना करण्यात आल्या आहेत.