माणदेश एक्सप्रेस न्युज
ठाणे : लांडगे विकले गेले, त्यांचा भाव काय होता हे सर्वांना माहिती आहे. निष्ठावंत निखारे शिवसेनेसोबत आहेत. उद्या याच निखाऱ्यांच्या मशाली होतील असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
ठाकरे गटाचे खासदार राजन विचार यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच ठाणे दौरा होता. यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी इथे भाषण करायला उभा नाही, मात्र लवकरच भाषण करायला येणार आहे. आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलो आहे. येत्या काही दिवसात ठाणेकरांच्या राजकीय आरोग्यासाठी मी इथे येणार आहे. सध्या राजकारणात विकृतपणा आणि गलिच्छपणा आलेला आहे. तो समोर दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही याचा अभिमान आहे. अन्यायाला लाथ मारायची आहेच, पण 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आपण विसरलेलो नाही. राजन विचारे त्यांचे शिलेदार निष्ठावंत शिवसैनिक इथे आहेत. बाकी विकाऊ होते ते विकले गेले, त्यांचा भाव सांगण्याची गरज नाही असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सगळ्या बंडखोर आमदारांचा त्यांनी समाचार घेतला.