माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर सन 2023-2026 या कालावधीसाठी अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीकरीता शासन निर्णय दि. 29 ऑगस्ट 2022 व 23 नोव्हेंबर 2022 मधील निकष, कार्यपध्दती व तरतुदींनुसार इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित इच्छुक संस्थांचे प्रतिनिधी व व्यक्ती यांनी दि. 22 फेब्रुवारी 2023 अखेर विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 हा दिनांक 20 जुलै 2020 पासून अंमलात आलेला असून महाराष्ट्र शासन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील दि. 29 ऑगस्ट 2022 च्या शासन निर्णयामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबतचे निकष व कार्यपध्दती नमूद करण्यात आलेली आहे. शासन निर्णय दि. 23 नोव्हेंबर 2022 अन्वये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबत तरतुदी विषद करण्यात आलेल्या आहेत. सदर निकष, कार्यपध्दती व तरतुदींनुसार सन 2023-2026 या कालावधीसाठी अशासकीय सदस्यांचे नियुक्तीकरीता शासन निर्णयात नमुद प्रवर्गनिहाय अर्ज इच्छुक उमेदवार यांच्याकडून मागविण्यात आले आहेत.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांची नियुक्तीसाठी निश्चित करण्यात आलेले निकष, निवडीबाबतची कार्यपध्दती याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीचे अधिकृत संकेतस्थळ www.sangli.nic.in येथे प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधित इच्छुक संस्थांचे प्रतिनिधी व व्यक्ती यांनी दि. 22 फेब्रुवारी 2023 अखेर विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती तथा जिल्हाधिकारी सांगली यांच्या नावे पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे प्रत्यक्ष अथवा dsosangli01@gmail.com जिल्हा पुरवठा कार्यालय सांगली ई-मेल आयडी वर “जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सन 2023-2026 अशासकीय सदस्यांचे नेमणूकीबाबत” या आशयाने पाठविण्याचा आहे, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.