माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2022-23 या वर्षात राबविली जात आहे. प्राथमिक निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे दि. 30 जानेवारी 2023 पर्यंत संकेतस्थळावर अथवा मोबाईल अॅपवर ऑनलाईन पध्दतीने अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एस.एस.बेडक्याळे यांनी केले आहे.
ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांमधून ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील पशुपालकांची योजना निहाय प्राथमिक निवड झाली आहे. प्राथमिक निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांची यादी संबंधित सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन,जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय मिरज व तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय सांगली / इस्लामपूर/ तासगाव/ विटा/ कवठेमहांकाळ तसेच पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे संबंधित प्राथमिक निवड झालेल्या संबंधित अर्जदारांच्या मोबाईल क्रमांकावर सुद्धा संदेश प्राप्त झाला असल्याचे डॉ. बेडक्याळे यांनी सांगितले.
