चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ५ वर्षीय मुलाची स्मरणशक्ती अतिप्रमाणात चालते. तो १५ तालुके, देशातील सर्वच राज्यांची नावे आणि जगातील एकूण २४७ देशांची नावे पटापट सहजपणे जराही न थांबता सांगत सुटतो. काही देशांची नावे उच्चारायला महाकठीण; पण ती नावे तो स्पष्टपणे उच्चारतो.
अर्थात अभ्यासातही तो हुशार आहे. त्याचे वडील मारुती आत्राम हे त्याच्याविषयी सांगतात, चित्रांश दीड वर्षाचा असताना तो खेळणी सोडून पुस्तकच चाळायचा! त्याच्या जवळचे पुस्तक कोणी हिसकले की तो रडायला लागायचा.

पुस्तकांबाबतचा त्याचा हा लळा बघून सहज म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांची नावे त्याला ऐकवली आणि आश्चर्य असे की ती त्याने सर्व नावे लगेचच बरोबर उच्चारलीत.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास, त्यांची शौर्यगाथा त्याला पाठ आहे. महाराजांचे वडील, आजोबा, आई जिजामाता व राण्यांची नावे सांगतो. संगीताचीही त्याला आवड असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची गाणी तन्मयतेने तो गातो. त्याचे वडील संगीताचे प्रशिक्षक आहेत व आई गृहिणी. चित्रांशची स्मरणशक्ती बघून सारे अचंबित होतात. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व अनेक मान्यवरांनी त्याची स्मरणशक्ती बघून कौतुकाने त्याची पाठ थोपटली आहे.