Latest Marathi News

BREAKING NEWS

खळबळजनक : भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या

0 886

माणदेश एक्सप्रेस न्युज
दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुलाने विवाहासाठी एका महिलेला पळवून नेल्याच्या कारणावरून पित्याने कुटुंबासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), जावई शाम पंडित फलवरे (वय २८), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४ वर्षे), नातू रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (वय ७), छोटू शाम फलवरे (वय ५) आणि कृष्णा शाम फलवरे (वय ३, सर्वजण रा. हातोला, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Manganga

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पवार हे मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरातील रहिवासी आहेत. ते एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड तालुक्यातील पारगाव येथे राहण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. मोहन हे निघोज गावात पालावर राहत असताना त्यांचा छोटा मुलगा अनिल पवार (वय २०) याने त्यांच्या समाजातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेला १७ जानेवारी रोजी पळवून नेले होते.

अनिलने महिलेला पळवून नेल्याचे समजताच मोहन पवार यांनी त्यांच्यापासून पुण्यात विभक्त राहत असलेला मोठा मुलगा राहुल पवार यास फोन करून ही माहिती दिली. ‘तुझ्या छोट्या भावाने एक मुलगी पळवून नेली आहे. त्यामुळे ती परत आणण्यास त्याला सांग, अन्यथा आम्ही विष घेऊन कुटुंबासह आत्महत्या करू,’ असे सांगितले होते. त्यानंतर त्या दिवशी रात्री मोहन हे त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन समाजात बदनामी होईल, या भीतीने दुसरीकडे निघून गेले. त्यानंतर ते कोणाला दिसले नाहीत. दरम्यान पोलिसांना १८ ते २२ जानेवारी या पाच दिवसांत पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात चार मृतदेह मिळून आले. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. तसेच नदीपात्रात आणखी मृतदेह असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार यवत पोलीस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या बचाव पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोधकार्य सुरू केले. त्यानंतर मंगळवारी दुपारी एक वाजता आणखी तीन लहान मुलांचे मृतदेह बचावकार्य पथकास सापडले. मृतांपैकी एका महिलेजवळ मोबाइल सापडल्याने मृतांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन ‘माणदेश एक्सप्रेस’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!