माणदेशातील आटपाडी तालुका सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर येतो. हा तालुका अवर्षणग्रस्त दुष्काळी तालुका म्हणून शासन दरबारी नोंद आहे. आटपाडी, सांगोला, माण हे तालुके सांगली, सोलापूर व सातारा या जिल्ह्यांमध्ये येतात या तीन जिल्ह्यातील दुष्काळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा, वेळेत ऊस तोड व्हावी, तसेच दुष्काळी भागातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून आटपाडी गांवचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी आटपाडी येथील सोनार सिद्धनगर जवळ सहकारी साखर कारखाना उभा करणेचे निश्चित केले. तीन तालुक्यातून शेअर्स गोळा करणेस सुरुवात केली. नोंदणी करणेसाठी सर्व कागदपत्राची पूर्तता केली त्यास अनुसरून शासनाने कारखान्यास नोंदणी प्रमाणपत्र दिले. त्याचा क्रमांक एस.ए.एन.पी.आर.जी.(५)दिनांक २५/११/१९८१ ने नोंदणी झाली, व सदर कारखान्याचे नाव माणगंगा सहकारी साखर कारखाना लि. सोनार सिद्धनगर आटपाडी असे ठेवण्यात आले. सन १९८८ ते १९९३ या पंचवार्षिक निवडणुकीत अनुसूचित जाती/जमाती या प्रवर्गातून माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून प्रल्हाद खरात यांची निवड करण्यात आली. आटपाडी सोसायटी नं.१ चे संचालक म्हणून सुद्धा त्यांची निवड करण्यात आली होती.
आटपाडी येथील पूर्वश्रमीच्या महार समाज्यात सोमा बाळकृष्ण खरात व दाळूबाई सोमा खरात यांच्या पोटी गिरजाबाई, सावित्री व प्रल्हाद अशी तीन अपत्ये झाली. प्रल्हाद यांचा जन्म आटपाडी येथे दिनांक ०७/०३/१९३८ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण आटपाडी येथील गुराखी वर्ग या शाळेत दिनांक ०१/०६/१९४८ रोजी त्यांनी प्रवेश घेतला व शाळेत शिक्षण घेऊ लागले. इयत्ता तिसरी मध्ये असताना शाळेच्या वर्गातील शिक्षकाच्या लाकडी खुर्चीत लोखंडी खिळे मारून ठेवले होते. कारण वर्ग शिक्षक अभ्यास येत नसलेमुळे प्रल्हादच्या हातावर व पायावर छडीने मारत असत. व अस्पृश्य महार समाज्यातील मुलांना शाळेतील वर्ग खोल्या शेणानी सारवून घेत असत, त्याचा राग येऊन त्यांनी खुर्चीत खिळे मारले होते. खिळे मारलेचे इतर विद्यार्थ्याकडून गुरुजींना समजले होते, त्यामुळे प्रल्हाद हे माराच्या भीतीपोटी शाळेत जात नव्हते. या कारणास्तव दिनांक ०४ / १२ / १९५० पासून त्यांनी कायमचीच शाळा सोडलेली होती.

आटपाडी येथील पूर्वश्रमीच्या महार समाज्यात आठ आडके होते. प्रल्हाद खरात यांच्या आडक्यास “ नवाळेचा” आडका म्हणत असत, पूर्वीच्या काळी गांवगाड्यातील मयताचा “ सांगावा ” सांगणेसाठी प्रत्येक आडक्यातील घराचा क्रमवार नंबर ठरलेला असायचा त्याप्रमाणे प्रल्हाद खरात यांचे घराचा नंबर “सांगावा” सांगणेसाठी आले नंतर पंचायत व्हायची कारण प्रल्हादाचे वडील वारले होते व प्रल्हादचे वय सुद्धा लहान असलेमुळे गंभीर प्रसंग निर्माण होत होता. गाववाड्यातील चाली व प्रथा रिवाज असलेमुळे प्रल्हादची आई दाळूबाई समाज्यातील माणूस रोजंदारी देऊन त्या बदल्यात “सांगावा” सांगणे साठी माणूस पाठवित असत.
प्रल्हादची आई दाळूबाई हिंमतीने व जबाबदारीने घर चालवित होती. घरची परिस्थिती नाजूक होती. गावगाड्याच्या नियमानुसार शेतीच्या कामासाठी पूर्व श्रमीच्या महार समाज्यास कुळवाड्याची घरे ठरवून देणेत आलेली होती. त्याप्रमाणे दाळूबाईस शेंगदार मळ्यातील कुळवाड्याचे शेत जमिनीत शेतमजुरी करावी लागत असत आपल्या लहान मुलांना घेऊन शेतात कामे करीत असत त्यामुळे शेंगदार मळ्यातील कुळवाडी दाळूबाईस ज्वारी, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू देत असत. त्यामुळे दाळूबाई आपल्या मुलांचे योग्यरित्या पालन पोषण करीत होती. समाज्याच्या वस्तीत जुने माळवदी धाब्याचे तीन खणी घर व छप्पराच्या घरात राहत होते.
प्रल्हाद हा घरातील कर्ता पुरुष असलेमुळे घरच्या गरीब परिस्थिती मुळे नाईलाजाने गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून काम करीत असत. थोड्या दिवसानंतर गवंड्याच्या हाताखाली जाऊन गवंडी कामातील बारकावे शिकून घेतले. ओळंब्यात भिंत व चौकट कशी उभी करायची, गुन्ह्या, थापी, हातोडा, छन्नी, कशी चालवायची या सर्व बाबी शिकून घेऊन कालांतराने गवंडी म्हणून स्वतंत्र बांधकामे करू लागले. गांवातील अनेकांची घराचे बांधकामे करू लागलेमुळे घरातील प्रपच्यास हातभार लागू लागला. यशा अवकाश बहीण गिरजाबाई व सावित्रीचे लग्न करून देणेत आले, दोन्ही बहिनीना नाझरे व चोपडी या गांवी नांदणेस पाठविणेत आले. त्यानंतर प्रल्हादचे लग्न डोंगर पाचेगाव येथील भामाबाई बरोबर लावणेत आले. त्यामुळे दाळूबाईस घरात सून आलेमुळे आनंद झाला. व घराच्या कामास हातभार लागू लागला.
प्रल्हाद खरात हे सडपातळ शरीराचे होते. रंग गोरा, उंची साडेपाच फुटाची नजर चेहरा बोलका, डोक्याला घडीची कोचदार पांढरी टोपी, तीन बटणी मलमली सदरा व धोतर, पायात कातडी चप्पल, चालनेची ढब दमदार, बोलणे सडेतोड, निर्भीड असे स्वभावाने शांत व निर्मळ होते. आटपाडी येथील पूर्व श्रमीच्या महार समाज्यातील तरुण मुलांनी एकत्र येऊन परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीसाठी खास करून लेझीम पथक स्थापन केले होते. तरुण मुलांनी रोजगारातून मिळालेल्या पैशातून वर्गणी काडून हालगी, घुमके, लेझीम पंढरपूरहून खरेदी करून आणले होते. आटपाडीच्या “तक्क्या” समोरील मोकळ्या जागेत लेझीमचा सराव करीत असत. लेझीमच्या खेळण्याच्या सर्व चाली शिकूण घेतल्या होत्या. हालगी वाजविणेचे काम पोपट अप्रतिमपणे करीत असत हालगी वाजवायला त्याला तोड नव्हती. उत्कृष्टपणे हालगी वाजवित असत. त्याच बरोबर घुमके वाजविणेचे काम गोपीनाथ चांगल्या प्रकारे करीत असत. हालगी पोपटराव व घुमके गोपीनाथराव या दोघांची जोडी आटपाडी व आसपासच्या गावात प्रसिद्ध झालेली होती. आटपाडीचे लेझीम पथक नावारूपाला आले होते. त्यामध्ये प्रल्हाद सुद्धा लेझीम चांगले प्रकारे खेळत असत. लेझीम पथकातील कलाकार गवंडीकाम व मजुरी करून लेझीम पथकाची कला सादर करीत, या भागातील गावोगावच्या डॉ.आंबेडकर जयंती साठी व लग्नाच्या वराती साठी सुद्धा लेझीम पथक खेळणेसाठी सायकल वरून जात असत.
आटपाडी भागातील खेडे गांवात प्रल्हाद खरात यांनी एका घराचे भीतीचे बांधकाम करणेचे घेतले होते. पावसाळ्याचे दिवस असलेमुळे घरमालकास बांधकामाबाबतची कल्पना दिली होती. परंतु घर मालक प्रल्हादला म्हणाला होता आपल्या भागात पाऊस पडत नाही, तुम्ही काळजी करू नका तुमचा रोजगार बुडविणार नाही, माझे घराचे बांधकाम सुरू करा. त्यामुळे प्रल्हाद यांनी हाताखाली दोन मजूर घेऊन बांधकाम सुरू केले होते. तीन दिवसात दगड, चिखल मातीने कपऱ्याची भर करून भिंतीचे बांधकाम पूर्ण केले होते. परंतु तिसऱ्या दिवशी सायंकाळी मुसळधार पाऊस पडलेमुळे दगड चिखल मातीच्या भिंतीत पाणी गेले मुळे निम्मी अर्धी भिंत पावसाच्या पाण्यामुळे पडली होती.
शनिवारी आटपाडी गांवचा आठवड्याचा बाजार असतो. मरीमातेच्या मंदिराजवळ प्रल्हाद व त्यांचे दोन मजूर घर मालकाची वाट पाहत बसले होते. दुपारच्या वेळी घर मालक बाजारासाठी सायकलवरून येताना प्रल्हाद यांनी पाहून त्यांना आवाज दिला. त्यामुळे घर मालकांनी सायकल थांबवली. व प्रल्हाद कडे पाहात म्हणाला, तुम्ही बांधलेली भिंत कालच्या पावसात पडलेली आहे. उद्या सकाळी लवकर या भिंत बांधून द्या, आणि मग तुमच्या रोजगाराचे पैसे घेऊन जावा, हे ऐकल्यावर प्रल्हाद बरोबर असणाऱ्या मजुरांचे चेहरे काळवंडले. घरी आठवड्याचा बाजार घेऊन नाही गेलो तर बायका पोरे उपाशी झोपतील हि ” विवेचना त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. त्यामुळे प्रल्हाद व दोन मजूर घर मालकास म्हणाले, आमचे हातावरचे पोट आहे, आमची ठरलेली मजुरी द्या, उद्या तुमची पडलेली भिंत बांधून देतो, त्यावर घर मालक म्हणाला तुम्ही बांधलेली भिंत पडलेली आहे. आणि वरून मलाच पैसे मागता, भिंत बांधल्या शिवाय तुम्हाला रुपया सुद्धा देणार नाही, त्यावर प्रल्हाद म्हणाला पावसाळ्यातील दिवसात बांधकाम करू नका असे मी तुम्हाला अगोदरच बजावले होते, परंतु माझे ऐकले नाही. पावसात भिंत पडलेली आहे. त्या भिंतीला आम्ही काय धरून बसायचे होते का ? पावसाला आम्ही काय पड म्हणालो काय ? अशी मरीमातेच्या मंदिराजवळ चर्चा सुरू असताना बघ्याची गर्दी वाढली होती. प्रल्हादने घरमालकास चांगलेच फैलावर घेतले व म्हणाला आमचे कष्टाचे मजुरीचे पैसे तुम्हाला द्यायचे द्यावेच लागतील असे ठणकावून सांगितल्यामुळे घर मालकाने जमलेल्या गर्दीकडे पाहून सदऱ्याच्या खिशाच्या आतील कप्यातून पैसे काडून प्रल्हादाच्या हातावर ठेवले. त्यामुळे प्रल्हाद व दोन मजुरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले, आठवड्याच्या बाजारातील सामानाचा प्रश्न मिटला होता.
प्रल्हाद यांचा समाजकार्याकडे ओढा वाढू लागला होता. गांवात जर कोणाचे बांधकाम करणेस घेतले तर हाताखालच्या गवंडी व मजुरावर बांधकाम सोपाहून ते समाजकार्यासाठी शासकीय कार्यालयाकडे जाऊन छोटी-मोठी कामे करीत असत. समाज कार्य करीत असताना आटपाडीचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या संपर्कात प्रल्हाद खरात आलेमुळे त्यांचा सहवास त्यांना लाभला. मोठ्या झाडाच्या सावलीत गेलेमुळे त्यांच्या सामाजिक कार्यास गती येऊ लागली. प्रल्हाद यांच्या राहणीमानात व जीवनात बदल घडू लागले. त्यामुळे देशमुख घराण्याशी एकनिष्ठेने व एक वचनाने राहत असत.
आटपाडी भागातील भूमिहीन गरीब मुजरासाठी शासकिय धान्य गोडाऊन जवळील सर्वे नं.१३९१/२ मधील अठरा भूमिहीन मजुरांना प्रत्येकी क्षेत्र १०० चौरस वार इतकी मोफत जागा घरासाठी दिनांक २९/०१/१९७६ रोजी देण्यात आलेली आहे. त्याबाबत प्रल्हाद खरात यांनी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचेकडे पाठपुरावा केलेमुळे तहसिलदार सो, आटपाडी यांचे कडून मोफत जागा देण्यात आलेचे आदेश घेणेत आले होते. यामुळे प्रल्हाद खरात यांनी सामाजिक जाणीवेतून कार्य केलेले आहे. तसेच त्यांनी सन १९७७-७८ पासून दहा वर्षे होमगार्ड म्हणून सुद्धा काम केलेले आहे.
पंढरपूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आटपाडी व खानापूर हे दोन तालुके पंढरपूर मतदार संघात घालणेत आले होते. या मतदार संघातून अनुसूचित जातीचाच उमेदवार निवडून जात असलेमुळे प्रल्हाद खरात यांनी उमेदवारी अर्ज आनलेला होता. त्यामुळे त्यांना आटपाडी भागात खासदार म्हणूनच सर्वजण बोलत असत. व तशी चर्चा सर्व तालुक्यात झालेमुळे सर्वजन प्रल्हाद खरात यांना खासदारच म्हणत असत.
प्रल्हाद खरात यांनी समाजकारण राजकारण करीत असताना कधीही – पैशाचा मोह धरला नाही. कुणाकडूनही जबरदस्तीने पैसे घेतले नाहीत. कुणाचाही विश्वास घात केला नाही. समाज्यात कपटनीतीने कुणाशीही वागले नाहीत. सडेतोड वृती असलेमुळे निर्मळ स्वभावाचे प्रल्हाद खरात होते. त्यांचे निधन आटपाडी येथे दिनांक २०/०९/२०००रोजी झाले. आटपाडी गांवातील “तक्या” बाजार पटांगणातील मरिमातेचे मंदिर, महादेव भिंगेचे हॉटेल, ग्रामपंचायतीचा कट्टा, सूर्योपासना मंदिर कट्टा, गुळभिलेचे रेशनिंग दुकान, चावडी, देशमुखाचा वाडा हे त्यांचे बसने उठनेचे ठिकाण होते. आटपाडी गांव व बौद्ध समाज एका कृतिशील कार्यकर्त्यास मुकला आहे.
लेखन
विलास खरात, आटपाडी
मोबा- ९२८४०७३२७७