नवी दिल्लीः राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत चालताना काँग्रेसचे खासदार संतोष सिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखू लागले. आजू-बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता पुढील उपचारादरम्यान संतोष सिंह यांचा मृत्यू झाला.
याबद्दल अधिक माहिती अशी की, भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. आज लुधियानातील लाडोवाल टोल प्लाझा येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. ती फगवाड्याच्या दिशेने जात होती. यात्रेत खासदार संतोष सिंह चौधरी हेदेखील राहुल गांधींच्या जथ्थ्यासोबत चालत होते. मात्र सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास संतोष सिंह चौधरी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागले. यात्रेतील रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तत्काळ फगवाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संतोष सिंह चौधरी हे 76 वर्षांचे होते.

दरम्यान, संतोष सिंह यांच्या निधनाचे वृत्त कळताच प्रमुख काँग्रेस नेत्यांसोबत राहुल गांधी रुग्णालायाच्या दिशेने रवाना झाले. भारत जोडो यात्रा काही काळापुरती स्थगित करण्यात आली आहे.