सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील तडवळे गावात ट्र्रॅक्टरखाली येणाऱ्या मुलांना वाचवताना आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संचिता संपत पाटील असं २८ वर्षीय महिलेचं नाव आहे.
संचिता जनावरांचा गोठा स्वच्छ करत होत्या. याठिकाणी उताराला ट्रॅक्टर लावला होता. तेथेच त्यांची दोन्ही मुले क्रशांत (वय २ वर्षे) आणि दुर्वा( वय ४ वर्षे) खेळत होते. मात्र अचानक ट्रॅक्टर उतारामुळे पुढे येत आहे हे संचिता यांनी पाहिले. त्या ट्रॅक्टर पुढेच मुले खेळत होती त्यामुळे हा ट्रॅक्टर मुलांच्या अंगावर जाईल. म्हणून संचिता या मुलांना वाचवण्यासाठी पळत येतांना त्यांचा पाय घसरला आणि त्या पडल्या. यावेळी त्यांना ट्रॅक्टरला लावलेला नांगराचा फाळ लागून त्या गंभीर जखमी झाल्या. गंभीर जखमी संचिता यांना तातडीने इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा काल सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

दरम्यान, याबाबत शरद बबन पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे