मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाचा कार्यकाल येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुखपदाचे नेमके काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
माहितीनुसार, येत्या २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची ५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच तारखेला त्यांची संघटनात्मक प्रमुख पदाची मुदत संपत आहे. तर या संघटनात्मक निवडणुकांसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करताना म्हटलं की, शिवसेना पक्षाची घटना ही बाळासाहेब ठाकरेंनी तयार केली होती. ते हयात असताना उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष हे पद देण्यात आलेलं होतं. परंतु बाळासाहेबांच्या निधनानंतर घटनाबाह्य पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण करण्यात आलं. याशिवाय २०१८ साली पक्षातील कोणत्याही नेत्याला विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेत अनेक बदल केले. त्यामुळं ठाकरेंचं पक्षप्रमुख हे पदच बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.