मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढवणार असल्याचे समोर आले आहे. संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने जामीन रद्द करावा यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
माहितीनुसार, संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या ईडीच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे तब्बल 100 दिवस जेलमध्ये राहून आलेले संजय राऊत यांच्या कदाचित अडचणी वाढू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई हायकोर्टात 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी ईडी आता हायकोर्टात गेली आहे .

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने अजामीनपत्र वॉरंट जारी केले आहे, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. शिवडी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे.