पुणे : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील चास येथील घोडनदीवर वाढदिवसानिमित्ती फिरायला गेलेल्या सेल्फी काढण्याचा नादात तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. साईप्रसाद वेन्नपूसा बालमलकोंडा असं मृत तरुणाचं नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, साईप्रसाद मुळचा आंध्र प्रदेशातील होता, मात्र शिक्षणानिमित्त तो जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील रा.प.सबनीस महाविद्यालयात कॉमर्स शाखेत बारावीत शिकत होता. साईप्रसाद वाढदिवस असल्याने कॉलेजला न जाता मित्रांसोबत चास येथे फिरायला गेला होता. तेथे घोडनदीत असलेल्या रांजण खळग्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह त्याच्या जीवावर बेतला. येथे सेल्फी काढताना त्याचा पाय घसरला आणि त्याचा पाण्यात पडून मृत्यू झाला.

दरम्यान, रांजण खळगे खूप खोल असल्याने घोडेगाव पोलीस आणि नागरिकांनी बराच शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.