कसारा: शहापूर तालुक्यातील कसारा नजीकच्या जंगलात गुरुवारी सायंकाळी एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कसारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी आणि तरुणी दोन वर्षांपासून लिव्ह ॲण्ड रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. या वादातून तरुणीला कसाऱ्याजवळील जंगलात नेऊन तेथे आरोपीने मित्राच्या मदतीने तिचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जंगल भागातील रस्त्याच्या कडेला वारलीपाडा गावानजीक २१-२५ वयोगटातील एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती कसारा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी दिली. एका प्रवाशाच्या नजरेस हा मृतदेह पडला. त्यानेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक दीपाली धाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप गीते, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी मनोरे, पोलिस उपनिरीक्षक सलमान खतीब आदींनी सीसीटीव्ही व मोबाइलच्या मदतीने भिवंडी येथून दोन आरोपीना अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींची नावे देण्यास पोलिसांनी नकार दिला.