कोल्हापूर: शिवसेनेसोबतच्या युतीला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या या आरोपावर स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवार म्हणाले, “ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित पावलं टाकावी हा आमचा महाराष्ट्रापुरता प्रयत्न आहे. काही राजकीय पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षातील काही गटांचा आघाडीत समावेश करावा, अशी इच्छा आहे. आम्ही चर्चेच्या स्थितीत आहोत. अंतिम निर्णय घेतलेला नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही अनेक प्रश्नावर एकत्रित निर्णय घेतो. उद्याच्या निवडणुकीसाठीही एकत्रित भूमिका घ्यायला काही अडचण येणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. पण सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची विधाने वेगळीच आहेत. काही लोक तुरुंगात टाकणार असं म्हणत आहेत. काही लोक जामीन रद्द करू असा इशारा देत आहेत. ही राजकीय नेत्यांची कामे नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे, असा चिमटा त्यांनी राज्य सरकारला काढला.
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली.