नवी दिल्ली : देशभरातील अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. बिहारमध्ये देखील थंडीचा पारा चढला आहे. अशा परिस्थितीत जॅकेटची मागणीही झपाट्याने वाढली आहे. पण, बिहारमधील छपरामधून जॅकेटवरून एक धक्कादायक घटना घडली आहे.
खरं तर वैशाली जिल्ह्यातील विवाहित तरूणाने जॅकेटची मागणी पूर्ण न केल्याने पत्नीची हत्या केली. रितिका कुमारी असे मृत महिलेचे नाव असून ती छपराच्या मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील मंगाईडीह गावातील रहिवासी होती.

दरम्यान, वैशाली जिल्ह्यातील देसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालीचरण सिंग याच्यासोबत 8 महिन्यांपूर्वी रितिकाचे लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून हुंड्याची मागणी करून रितिकाचा छळ होत असल्याचा आरोप मृत रितीकाच्या नातेवाईकांनी केला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिकाच्या हत्येपूर्वी दोन दिवस आधी जॅकेटसाठी तिचा छळ करण्यात आला होता, याची माहिती तिने आईला दिली होती.याप्रकरणी वैशाली जिल्ह्यातील देसरी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.